Farmingशेती टिप्ससेंद्रिय शेती

Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी महत्वाचे पाच उपाय

Organic Farming : जमिनीची सुपीकता कमी होत चालल्याने फक्त पिकांच उत्पादनच नाही, तर जमिनीची उत्पादकता आणि गुणवत्तेवरही परिणाम होतो. त्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे.

सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजीवांचं अन्न आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून असतं.पण बदलत्या हवामानामुळे आणि पीक उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते आणि पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली. अशा परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर भर देणं गरजेच आहे.

जमिनीची कमीत कमी नांगरट केल्यामुळे सेंद्रिय कर्ब संवर्धनास मदत होते. याशिवाय जमिनीची धूप थांबविण्यासाठी प्रयत्ने केले गेले पाहिजेत. यासाठी दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापुर्वी म्हणजे एप्रिल मे महिन्यात शेताची बांधबंदिस्ती करुन घ्यावी.  

उन्हाळ्यात किंवा पाण्याची कमतरता असेल तेव्हा काढणीनंतर मिळालेले पिकांचे अवशेष शेतात आच्छादन म्हणून वापरावेत.  यामध्ये खोडवा उसात पाचटाचे नियोजन, कोरडवाहू जमिनीत लागवड केलेल्या ज्वारी पिकात तुरकाठ्या, बाजरी सरमाडाचे आच्छादन यासारख्या उपायांचा समावेश होतो. 

जमिनीची पूर्वमशागत करताना कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर शिफारशी प्रमाणे जमिनीत सेंद्रिय आणि कंपोस्ट खताचा वापर करुन जमिनीची सुपिकता वाढविता येते. तसंच हिरवळीची पिके जमिनीत गाडूनही जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढविता येते. त्यासाठी कमीत कमीतीन वर्षातून एकदा ताग, धैंचा यासारखी पिके घेऊन पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावीत.

पेरणीपुर्वी बियाण्यावर अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणू संवर्धकाची  बीजप्रक्रिया करुन किंवा शेणखतात मिसळून वापर करावा. याशिवाय पिकांची  फेरपालट करुनही जमिनीची सुपिकता वाढविता येते. त्यासाठी फेरपालटीत कडधान्यवर्गीय पिके आलटून पालटून घ्यावीत. याशिवाय पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. खतांचा वापर करताना खतांची मात्रा संतुलित प्रमाणा घेऊन खते योग्य वेळी आणि योग्य प्रकारे द्यावीत. त्यामुळे खते वाया न जाता ती पिकाला लागू पडतील आणि जमिनीचं आरोग्य ही ढासळणार नाही. अशा प्रकारे सेंद्रिय कर्ब वाढीसाठी योग्य नियोजन करुन मशागत, आच्छादन आणि खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास सेंद्रिय कर्ब वाढविता येतो.