Chattrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: शिवरायांनी उभारलेले किल्ले मंदिरांपेक्षाही मोठे
Junnar News: ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरिता मंदिरांपेक्षाही मोठे असून, त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्या वतीने सातत्याने सुरू आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. १९) केले.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरू होते. शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकासकामे सुरू आहेत.
त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.
‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसमावेशक कारभार डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून, त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे; लोककल्याणकारी राज्य निर्मितीकरिता यापुढेही प्रयत्न करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले खऱ्याअर्थाने त्यांची दौलत आहे, ते आपले शक्तिस्थान, स्फूर्तिस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यशासनाच्या वतीने शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले परिसरांत विविध विकासकामे करीत आहेत, किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
आमदार श्री. सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलिस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलिस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. या वेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माँ जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली.
या वेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. अमोल डुंबरे, जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
‘किल्ले जागतिक वारसा स्थळे होणार’
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गड किल्ले नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसा स्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरिता येतील, अशा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.