Export-Grade Mango Registration: निर्यातक्षम आंबा नोंदणीसाठी अंतिम संधी; फक्त दोन दिवस शिल्लक!
Chhatrapati Sambhajinagar News: युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्देशसाठी अपेडाच्या ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. विहित मुदतीनुसार २८ फेब्रुवारीपर्यंत ही मुदत असून नोंदणीसाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत ९४५९ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झाली आहे.
माहितीनुसार,निर्यातक्षम आंबा बागांची ‘मॅंगोनेट’ या ऑनलाइन प्रणालीवर नोंदणी करण्याची आधीची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत होती. परंतु अपेडाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाकडे करण्यात आलेल्या विनंतीवरून ही मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे या कालावधीत विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी कृषी विभागामार्फत करणे अपेक्षित असल्याची सुचविण्यात आले.
त्यानुसार २०२४-२५ मध्ये २५ फेब्रुवारीपर्यंत राज्यात सुमारे ९४५९ निर्यादक्षम आंबा बागांची नोंदणी झाली आहे. निर्यातक्षम फळबागेत योग्य कृषी पद्धती राबविणे आवश्यक आहे. युरोपियन युनियन व अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी शेतकरी स्तरावर ठेवायच्या दस्तऐवजाचे विहित प्रपत्रात जतन करणे आवश्यक आहे. त्यासाठीच्या सूचना कृषी आयुक्तालयाच्या ६ जून २०२४ व १४ फेब्रुवारी २०२५ च्या पत्रांमधून देण्यात आलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उत्पादनात व चांगले आकारमान असलेले (१ ते २ एकर) किमान ४०० लाभार्थी शेतकरी आहेत. सुमारे ६५० एकर आंबा क्षेत्र जिल्ह्यात असल्याचे कसे विभाग आपण कळविण्यात आले आहे.
…अशी करता येईल नोंदणी
निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात (प्रपत्र-१) सातबारा, आठ अ, बागेचा नकाशा, आधार कार्डसह अर्ज दाखल करावा. त्यानंतर कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी यांच्या मार्फत क्षेत्राची तपासणी करून प्रपत्र-४ मध्ये अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सादर केला जातो. त्यानंतर २ ब प्रपत्रात नोंदणी प्रमाणपत्र अदा केले जाते. शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाच्या दृष्टीने शेतात राबविलेल्या महत्त्वाच्या बाबींच्या नोंदी प्रपत्र-क मध्ये नोंदी वेळेत घेणे आवश्यक आहे.
वाढीव मुदतीनंतर आता ‘मँगोनेट’ या ऑनलाइन प्रणालीवर नोंदणीसाठी दोन दिवसांचा अवधी उरला आहे. निर्यातक्षम आंबा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या अवधित आपली नोंदणी ‘मँगोनेट’वर करून घ्यावी. पी. आर देशमुख, अधीक्षक कृषी अधिकारी, जि. छत्रपती संभाजीनगर