Logistic Hub: महाराष्ट्रात लॉजिस्टिक क्रांती! औद्योगिक विकासाला नवी चालना
National Logistics Park: भारत सरकारने जाहीर केलेल्या पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन २०२१ नुसार रेल्वे, महामार्ग, जहाजबांधणी इत्यादीसाठी राज्यस्तरावर कृषी क्षेत्र व उद्योगधंद्यासाठी आवश्यक दळणवळणाच्या प्रगतीच्या दृष्टीने आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. शासनामार्फत जिल्हा, विभाग आणि राज्य अशा तीनही स्तरावर दळणवळणाचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे.
शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी महाराष्ट्र दळणवळण धोरण २०२४ नुसार या तीनही स्तरांवर व्यवसायाच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन केल्यास विविध प्रकल्पांच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या गोदामांना तसेच गोदाम आधारित मूल्य साखळ्यांच्या माध्यमातून या समुदाय आधारित संस्थांना निश्चित व्यवसाय उपलब्ध होऊ शकेल.
त्यादृष्टीने या संस्थांनी गोदामाशी निगडित व्यवसायाच्या संधी शोधून त्या अनुषंगिक पर्याय समजून घेताना दळणवळण या अत्यंत महत्त्वाच्या घटकाच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता या दळणवळणाशी निगडित धोरणाचा अभ्यास करून त्यातील शेतकरी कंपनी आणि सहकारी संस्थांच्या फायद्याच्यादृष्टीने उपयुक्त ठिकाणे आणि पर्यायी व्यवसायांची निवड करून वैज्ञानिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम, शीतगृहे, पॅकहाउस यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी करावी.
राष्ट्रीय मेगा लॉजेस्टिक पार्क
राज्यस्तरीय मेगा लॉजेस्टिक पार्क बरोबरच राष्ट्रीय स्तरावरील लॉजेस्टिक पार्कची निर्मिती करण्यात येत असून, नागपूर-वर्धा या ठिकाणी राष्ट्रीय मेगा लॉजेस्टिक पार्कची निर्मिती प्रगतिपथावर आहे. यासाठी चार राष्ट्रीय महामार्ग नागपूर जिल्ह्याला जोडले जात आहेत.
सुमारे १५०० एकरांवर नागपूर- वर्धा राष्ट्रीय मेगा लॉजेस्टिक हबची निर्मिती करण्यात येत असून ही जागा स्थानिक प्रशासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, राज्य सरकार, मुख्य नियोजन यंत्रणा, स्थानिक यंत्रणा यांच्या सहकार्याने घेण्यात आली आहे. खासगी क्षेत्राला गुंतवणुकीबाबत आवाहन करण्यात आले आहे.
या ठिकाणी कृषी, अभियांत्रिकी यासारख्या सर्व क्षेत्रातील पुरवठा साखळ्यांसाठी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा सुविधा उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरिता स्मार्ट दळणवळण संकल्पनेची निर्मिती करण्यात आली असून, त्याचा पुरेपूर वापर या ठिकाणी करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील लॉजेस्टिक पार्कमध्ये सुविधा
एकात्मिक लॉजेस्टिक पार्क.
गोदाम आणि शीतगृह.
सामुदायिक सुविधा केंद्र.
पॅकेजिंग सुविधा.
ट्रक टर्मिनल, बस टर्मिनल, रेल्वे.
कंटेनर फ्रेट स्टेशन. विमानतळ.
मेगा व अल्ट्रा मेगा लॉजेस्टिक पार्कसोबत कनेक्टिविटी
संशोधन केंद्र व प्रयोगशाळा
आंतरराष्ट्रीय विनिमय केंद्र
मिहान प्रकल्पासोबत जोडणी.
उद्योगांना विशेष अनुदान.
उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या उद्योगांना विशेष सवलत.