Farming

Watermelon Farming: कलिंगड पिकाचे यशस्वी नियोजन: गणेश काळे यांची आधुनिक शेती

High Yield Farming Management:

शेतकरी नियोजन । पीक : कलिंगड

शेतकरी : गणेश जगन्नाथ काळे

गाव : तामशी, ता. बाळापूर, जि. अकोला

एकूण शेती : ३२ एकर

कलिंगड क्षेत्र : २ एकर

बाळापूर तालुक्यातील गणेश काळे हे तरुण शेतकरी मागील पाच वर्षांपासून खरबूज लागवड करत आहेत. अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने खरबूज उत्पादनात त्यांचा हातखंडा आहे. या वर्षी त्यांनी बाजारपेठेतील मागणी आणि दर पाहून कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला आहे. घरीच रोपनिर्मिती करून दोन एकरांत कलिंगड लागवड केली आहे. सध्या रोपे वाढीच्या अवस्थेत असून योग्य व्यवस्थापनातून पिकाची चांगली वाढ झाली आहे, असे गणेश काळे सांगतात.

रोप निर्मिती व लागवड

कलिंगड लागवडीसाठी घरीच कोकोपीट आणि ट्रे आणून रोपे तयार केली जातात. दरम्यानच्या काळात लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रात नांगरट करून नंतर रोटाव्हेटर मारून शेत तयार केले.

त्यानंतर ट्रॅक्टरने पाच फूट अंतरावर गादीवाफे तयार करून २०ः२०ः०ः१३ या रासायनिक खताचा बेसल डोस दिला. शेळीच्या लेंडीपासून स्वतः बनविलेले गांडूळ खत एकरी दोन क्विंटल प्रमाणे दिले.

बेडवर ठिबकच्या नळ्या टाकून मल्चिंग पेपर पसरून घेतला. मल्चिंग पेपरला एक फूट अंतरावर छिद्र पाडून घेतले. त्यानंतर बेड चांगले भिजवून घेतले. सिंचनासोबतच ट्रायकोडर्मा, पीएसबी, रायझोबियम व जिवामृत यांच्या मात्रा दिल्या.

त्यानंतर छिद्र पाडलेल्या जागी एक फुटांच्या अंतरावर २० फेब्रुवारीच्या दरम्यान रोप लागवड केली. दोन एकरांमध्ये सुमारे १४ हजार रोपांची लागवड केली.

लागवडीनंतर साधारणपणे ३० मिनिटे ठिबकद्वारे पाणी दिले. त्यासोबत ह्युमिक सोडण्यात आले.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन

रोप लागवडीनंतर १०, ११ आणि १२ व्या दिवशी सलग तीन दिवस १९.१९.१९ चा ठिबकद्वारे वापर.

वेलींच्या वाढीसाठी लागवडीनंतर २२ व्या दिवशी १२ः६१ः० वापर.

फुलधारणा अवस्थेत वेलींच्या विस्तारासाठी लागवडीनंतर ३५ दिवसांनी १३ः४०ः१३ चा वापर.

फळधारणा सुरु झाल्यावर ०ः५२ः३४ ठिबकद्वारे वापर.

फळवाढीसाठी १३ः०ः४५ चा वापर ३ ते ४ दिवसांच्या अंतराने केला जातो.

आगामी नियोजन

सध्या वेल वाढीच्या अवस्थेत असून रोपांचे निरीक्षण करून त्यानुसार नियोजनाला प्राधान्य दिले जाईल.

कीड नियंत्रणासाठी एकात्मिक नियंत्रणाला प्राधान्य दिले जाते. त्यानुसार चिकट सापळे लावले आहेत.

उष्णतामान वाढत आहे. त्यामुळे एक दिवसाआड १५ ते २० मिनिटे ठिबकद्वारे सिंचन केले जाईल.

पीक संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर पाच दिवसांनी निंबोळी अर्क व ट्रायकोडर्मा यांची फवारणी करण्यात येईल. खत नियोजनानुसार सेंद्रिय व रासायनिक खतांचे पुढील डोस दिले जातील, त्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.

गणेश काळे ९५२७१५६७४७