Agriculture Warehouse- गोदाम उभारणी कशी करावी?
सद्यःस्थितीत वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या गोदामांची निर्मिती करताना माहितीच्या अभावी गोदामाची बांधणी शास्त्रीय पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी गोदामाची उभारणी करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
Warehouse Construction
शासनाकडील उपलब्ध माहितीनुसार देशात केंद्रशासनामार्फत मागील दहा वर्षात सुमारे ९५,००० किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्यांची उभारणी करण्यात आली असून याव्यतिरिक्त प्रत्येक राज्यात तेथील शासनामार्फत रस्त्यांची स्वतंत्र निर्मिती करण्यात आलेली आहे.
महत्त्वाचा मुद्दा असा की साधारणपणे जनगणनेसोबत प्राप्त माहितीच्या आधारे गोदाम पुरवठा साखळीशी निगडित व्यवसायाला चालना मिळणार आहे. लोकसंख्येला आवश्यक सर्व प्रकारच्या रोजच्या वापरातील वस्तू (एफएमसीजी) जसे की किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य इत्यादीच्या साठवणुकीकरिता वैज्ञानिक पद्धतीने बांधलेल्या गोदामांची आवश्यकता भासणार आहे.
गोदामाचे बांधकाम
स्ट्रक्चरल स्टील
कंत्राटदाराने इमारतीच्या नकाशाच्या संरचनेचा अभ्यास करावा. भारतीय मानद ८००-१९६२ यानुसार फॅब्रिकेशनचे काम करावे. कैच्यावर ओढताना आणि त्या ठरविलेल्या ठिकाणी बसविताना नकाशाचा वापर करावा.फॅब्रिकेशनला लागणाऱ्या भागाची लांबी ही त्याच्या निर्धारीत रोलींगच्या लांबीपेक्षा जास्त नसावी. छोट्या लांबीचे तुकडे नसावेत. अन्यथा नकाशात दाखविलेल्या प्रमाणानुसार असावे.
गोदामाच्या प्रत्येक भागातील स्टीलचा सरळपणा, समांतरपणा, आणि आकार हे सर्व योग्यरीतीने करावे. त्याला ठोकू नये. तुकडे करताना किंवा वाकवताना लोखंडाची ताकद कमी होणार नाही याची काळजी घ्यावी.
मेटॅलिक पत्रे
गोदामाचे छत बनविण्यासाठी योग्य काळजी घ्यावी. सिमेंटच्या पत्र्याऐवजी उत्तम मेटलिक पत्रे वापरण्यात यावेत. छतासाठी २६ गेजचे गॅल्व्हॅल्यूम रंगीत थराच्या पॅनेलचे असावे. त्या पत्र्याची कमीत कमी इलस्ट्रेन्थ ५५० एमपीए (७९२०० पीएसआय) असावे. त्याची भौतिक गुणवत्ता एएसटीएमए ४४६(दर्जा इ)/ ए ६५३(दर्जा ५०), व गॅल्व्हॅल्यूम थर एएसटीएमए ७९२ (पांढरा) किंवा सिलिकॉन पॉलिस्टर १.०० माइल असावी. पाठीमागील बाजू पांढऱ्या रंगामध्ये ०.५ माइल जाडीची असावी.
गॅल्व्हॅल्यूम पत्रे बीएचपी स्टीलचे असावे किंवा त्या भारतीय मानदाप्रमाणे असावेत. प्रत्येक पॅनेल हा १ मीटरचा असावा.
सर्वसाधारणपणे रिब पॅनेल ३२ मिलिमीटर खोल आणि २५ मिलिमीटर ते ७९ मिलिमीटर रुंदीचे असून ते ३३३ मिलिमीटर अंतरावर बसविण्यात यावेत. अनेक संख्या असलेल्या रीलमधील अंतर १११ मीटर असावे. प्रत्येक पॅनेल हा १ मिलिमीटर रुंदीचा असावा. तरीसुध्दा रीब पॅनेलची उंची, टॅपींग व स्पेसींग हे सक्षम अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घ्यावे. याला काही दुसरा पर्याय असल्यास तो सुद्धा सक्षम अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घ्यावा.
जोत्यामध्ये मुरूम भराई
जोत्यामध्ये मुरूम भरण्याच्या अगोदर त्यातील मोकळी काही माती काढून बाहेर टाकावी. काळी माती असलेल्या ठिकाणी कठीण मुरूम भरण्यासाठी ०.९० ते १ मीटरची खोली घ्यावी. इतर ठिकाणी ०.६०मीटरची खोली घ्यावी. त्या मुरूमांमध्ये मऊ मुरूम, माती व इतर साहित्य नसावे.
कठीण मुरूम हा २० ते २५ सेंटिमीटरच्या थरात जोत्यामध्ये भरावा. सर्व थर १० ते १२ टन वजनाच्या रोलरने पाणी मारून दबाई करावी. रोलर कमीत कमी एकाच जागेवर दोन वेळा फिरवावा. मुरुमाची दबाई लवकर होण्यासाठी मुरुमावर एकसारखे पाणी मारावे.
जोत्यामध्ये ६०/४० आकाराच्या खडीचा भराव
दगडाच्या खाणीतून कठीण काळा दगड आणून दगड फोडून त्यामधून ६०/४० मिलिमीटर आकाराची खडी तयार करावी. त्या दगडावर हवामानाचा परिणाम झालेला नसावा. दगड मऊ व खराब असू नये.
खडीची भराई जोत्यात ठरलेल्या जाडीप्रमाणे करावी. तसेच खडीमधील पोकळ्या हाताने छोट्या खडीने भराव्यात. त्यास दबाई करण्यात यावी. खडीची दबाई करताना ठेकेदारांनी बांधकामाचा कोणताही भाग खराब होवू नये, याची योग्य ती दक्षता घ्यावी. बांधकामावर पाणी मारून पूर्ण मजबुती आल्यावर जोत्यात खडी भरणे सुरु करावे.
जोत्यामध्ये वाळू भराई
वाळू ही स्वच्छ व दाणेदार आणि स्थानिक पातळीवरील असावी. त्यामध्ये मातीचे प्रमाण १० टक्यांपेक्षा जास्त नसावे. १५सेंटिमीटर जाडीच्या थरामध्ये वाळूवर पाणी मारून १० ते १२ वेळा रोलरने दबाई करावी.
तळजमिनीचे १:२:४ मिश्रणाचे ट्रिमिक्स
काँक्रीट सिमेंट
सिमेंट हे भारतीय मानद २६९-१९६७ चे असावे. सिमेंट वापरण्यापूर्वी योग्य त्या गुणवत्तेचे असल्याची खात्री करावी.
वाळू
काँक्रीटसाठी नैसर्गिक वाळू वापरण्यात यावी किंवा फोडलेल्या दगडाची ,स्वच्छ, कठीण, टिकाऊ वाळू मागवावी.
खडी
काँक्रीटसाठी आवश्यक असलेली खडी ही फोडलेल्या दगडाची असावी. ती कोपरे असलेल्या आकाराची असावी. चपटी, गोल, आकाराची खडी वापरू नये. भारतीय मानद ३८३-१९७० आणि ५१५-१९५९ प्रमाणित असावी. साधारण तिचा आकार काँक्रीटच्या जाडीच्या १/४ पेक्षा जास्त असू नये.
काँक्रीटची गुणवत्ता
काँक्रीटसाठी खडी, वाळू, सिमेंटचे प्रमाणात मोजमाप करण्याकरिता लाकडी खोकी असावीत. काँक्रीटचे मिश्रण मेकॅनिक मिक्सरने करावे. वापरण्यात येणाऱ्या यंत्रणा चांगल्या गुणवत्तेच्या आणि चालू स्थितीत असाव्यात. त्या बांधकाम पूर्ण होईपर्यंत साइटवर कार्यान्वित राहील याची काळजी घ्यावी. काँक्रीटचे मिश्रण परिपूर्ण एकसारख्या रंगाचे होईपर्यंत मिक्सर चालू ठेवावे. काँक्रीटच्या १:२:४ प्रमाणातील मिश्रणासाठी सिमेंट व पाणी यांचे प्रमाण ०.५५ ते ०.६४ असावे. काँक्रीटचे मिश्रण तयार झाल्यावर ३० मिनिटामध्ये त्याचा वापर करावा.
काँक्रीट करण्यापूर्वी सेट्रींगच्या आतील बाजूस तेल किंवा योग्य त्या वापरण्याच्या बाबी सक्षम अभियंत्याकडून मंजूर करून घ्याव्यात. शक्यतो ठरावीक भागात काँक्रीटींग हे सातत्याने एकावेळी पूर्ण करावे. नकाशामध्ये ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जोड दाखवीत आहे, त्या ठिकाणी जोड करावा.
काँक्रीटचे शेवटचे सेटींग झाल्यावर त्यावर कमीतकमी १४ दिवस पाणी मारणे गरजेचे आहे. काँक्रीट ओतून झाल्यापासून रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशीसुद्धा काँक्रीटला सतत पाणी मारण्याची व्यवस्था करावी. गोदामातील सहा घनांचा १ संग्रह (१५०मिलिमीटर) वापरत असलेल्या काँक्रीटमधून ६० घनमीटरचे काम असेल किंवा ३ दिवसांचे काम असेल यासाठी भरून घ्यावा. १ सेट प्रयोगशाळेत तपासणीकरिता तयार करावा. प्रत्येक घनमीटर खडीचा स्रोत बदलला असेल, तर त्या खडीचे सहा घनांचा एक संग्रह बदलेल्या प्रत्येक भागाच्या काँक्रीटसाठी स्वतंत्र सेट भरावा. तीन सेट ७ दिवसांनी व उरलेले ३ सेट २८ दिवसांनी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावेत.
दबाई
काँक्रीटचे मिश्रण करताना आणि ओतताना त्यातून काँक्रीटमधले साहित्य (उदा. खडी, वाळू, सिमेंट) वेगळे होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ही काँक्रीटची दबाई करताना यांत्रिकी व्हायब्रेटरचा वापर करावा आणि लोखंडी सळईच्या सभोवती व्यवस्थित काँक्रीट भरावे, जेणेकरून त्यात पोकळ भाग राहू नये.
एकसंध काँक्रीट झाल्याची खात्री करावी. स्लॅब काँक्रीटची दबाई हाताने, टंम्पींग सळईने, स्क्रिड बोर्ड व टेपर सळई इत्यादींचा वापर करून करावी. यांत्रिकी मिक्सर, व्हायब्रेटरने दबाई करताना व पाणी मारतानाचे छायाचित्रे काढून ते आपल्या देयकासोबत सादर करावेत.
नवीन प्रकल्पामध्ये कार्यालयीन इमारतीच्या वर कर्मचारी निवास्थानाचे प्रयोजन करावे.
रस्त्याचे बांधकाम
नवीन रस्ता करण्यापूर्वी प्रथम कार्यान्वित असलेली रस्त्याची उंची तशीच ठेवावी. ड्रेनेज कार्यरत ठेवावे. रस्त्याची उंची वाढविण्यापूर्वी ड्रेनेज व आऊटलेट हा भाग महत्त्वाचा आहे. मुख्य जोड रस्ता सुस्थितीत ठेवावा. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येणार नाही.
गोदामातील विद्युत व्यवस्था
विद्युत व्यवस्था नवीन करताना पूर्वीच्या वायरिंगचा पुनश्च: वापर करण्यासंबंधी अंदाजपत्रकामध्ये कोणत्याही तरतुदीचा समवेश नसतो.
अ) नव्याने अंदाजपत्रक तयार करीत असताना, अशा उपयुक्त वायरींगचा समावेश न करता, त्याची कपात करण्यात यावी. तुटलेली केबल किती? उपयुक्त केबल किती? वापरण्यायोग्य असलेल्या केबलचा अंतर्भाव मूळ अंदापत्रकात न करता त्याचा पुनश्च विचार करण्यात यावा. मुख्यत्वे केबलचा पुन:विचार करावा.
ब) सर्व ठिकाणी केबल लोंबताना दिसतात. त्याकरिता पक्के फिटींग करावे.
क) वापरण्यात आलेले स्विच योग्य मानांकनाप्रमाणे नसतात, तरी ते क्रोम इत्यादी सारख्या प्रमाणित कंपन्यांचे असावेत. पाऊस जरी पडला तरी त्यामध्ये पाणी जाणार नाही असे असावेत. याशिवाय विद्युत दिवे, लोंबणारे दिवे जे आहेत त्यावर देखील पाऊस पडला तरी पाणी जाणार नाही अशी विद्युत व्यवस्था असावी.
ड) गोदामाच्या बाहेरच्या बाजूस विद्युत व्यवस्था असावी. अंतर्गत भागात विद्युत व्यवस्थेची तरतूद करण्यात येऊ नये. (माहिती स्रोत: महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे निवृत्त अभियंता यांच्याकडून प्राप्त माहिती)
– प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)