Farmingपशुपालन

Animal Care: जनावरांतील उष्णतेचा ताण कमी करण्याचे उपाय

डॉ. सचिन राऊत, डॉ. शरद चेपटे

Summer Care: गोठ्याच्या परिसरात झाडांपासून मिळणारी सावली हा एक उत्कृष्ट उष्णतेचा ताण कमी करणारा नैसर्गिक स्रोत आहे. झाडांच्या पानांच्या पृष्ठभागावरील ओलावाचे बाष्पीभवन सभोवतालचे वातावरण थंड ठेवते. जनावरांना सावलीच्या जागी बांधावे. जनावरांच्या गोठ्यात खाली वाळू टाकली असल्यास त्यावर पाणी शिंपडावे. जनावरांना गोठा किंवा पत्र्याच्या शेडमध्ये बांधत आसल्यास ती जागा हवेशीर असावी याची विशेष काळजी घ्यावी. पक्क्या छताच्या गोठ्यामध्ये व्हेंटिलेटर बसवावेत.

जास्त उष्णता असल्यास जनावरांना थंड पाण्याने २ ते ३ वेळेस अंघोळ घालावी. गोठ्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त जनावरे बांधू नयेत आणि रात्रीच्या वेळी मोकळ्या जागेवर जनावरे बांधून ठेवावीत. जनावरांचे थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी जनावरांच्या शेडच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाळा किंवा तागाच्या पोत्याचा पडदा लावावा. गोठ्यामध्ये फॉगर्स लावावेत. त्यामुळे गोठा थंड राहतो. कोरड्या हवामानात ही पद्धत प्रभावी आहे.

मिस्टर्स

मिस्टर्समुळे तयार झालेल्या पाण्याच्या थेंबांचा आकार धुक्याच्या कणांपेक्षा थोडा मोठा असतो. मात्र दमट वातावरणात ही यंत्रणा फारशी प्रभावी ठरत नाही. दमट ऋतूमध्ये हवेतील ओलावा, थेंबांचा आकार मोठा असल्याने, पाण्याचे थेंब वातावरणात पसरण्याऐवजी जनावरांच्या गोठ्याच्या फरशीवर पडतात. यामुळे गोठा, चारा ओला होतो.

उष्णता कमी करण्याची नैसर्गिक यंत्रणा

उष्ण व दमट हवामानात जनावरांना सावली महत्त्वाची असते. जनावरांची त्वचा ओलसर ठेवून जनावरांच्या गोठ्यातील हवेचा प्रवाह वाढवून जनावरांच्या शरीरातून बाष्पीभवनाच्या साह्याने उष्णता कमी करता येते.

आहारात बदल

उच्च पर्यावरणीय तापमानात, शरीरातील बाष्पीभवन उष्णता कमी करण्याची मुख्य यंत्रणा म्हणजे घाम येणे आणि जलद श्‍वास घेणे. उच्च तापमानात, शरीरातील घामाद्वारे पाणी कमी होण्यामुळे तहान आणि मूत्र उत्सर्जनाद्वारे पाण्याचा वापर वाढतो. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उन्हात असलेल्या जनावरांच्या शरीरातून पोटॅशिअमची हानी होण्याचे प्रमाण फार वाढते. पोटॅशिअम वाचविण्याच्या प्रयत्नात, जनावरांमध्ये सोडिअमचे मूत्र उत्सर्जनातील प्रमाण वाढते.

उच्च तापमानात श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो (बाष्पीभवनाद्वारे शरीराला थंड करण्याची एक महत्त्वाची पद्धत). शरीरातून कार्बन डायऑक्साइड वेगाने बाहेर पडल्यामुळे श्‍वसन क्षारता रिस्पायरेटरी अल्कलोसिस होतो. मूत्र विसर्जनाद्वारे शरीरातून बायकार्बोनेट बाहेर टाकून जनावर याची भरपाई

करतात. त्यांच्या सतत बदलण्यासाठी जनावारांच्या रक्त रसायनशास्त्राचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.

उष्णतेच्या ताणामुळे जनावारांच्या आहारात या इलेक्ट्रोलाइट्सची गरज वाढते. आहारातील इलेक्ट्रोलाइट संतुलन पाणी आणि चाऱ्यामध्ये शरीरासाठी आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स संतुलनावर आधारित आहे. हा आहार इलेक्ट्रोलाइट संतुलन स्थिर करतो, होमिओस्टॅसिस वाढवतो, शरीरातील द्रवांचे ऑस्मोरेग्युलेशन होण्यास मदत होते आणि भूक

वाढते. उष्णतेच्या ताणाच्या वेळी उद्‍भवणाऱ्या शारीरिक समस्यांना तोंड देण्यासाठी जनावरांच्या आहारात उच्च ऊर्जावान व उच्च दर्जाचा चविष्ट चारा द्यावा.

आहारामध्ये यीस्टचा समावेश

कोठीपोटाशी संबंधित यीस्ट जनावरांच्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. यीस्टमुळे आम्लता ठीक झाल्याने ॲसिडिटीशी संबंधित समस्या कमी होतात.

कोठीपोटामधील आहारातील तंतू आणि नायट्रोजनचा वापर पचनशक्ती वाढवून आहाराची उपयुक्तता वाढेल.

यीस्टमुळे कोठीपोटामध्ये पचनासाठी फायदेशीर जिवाणू वाढतात.

आहारात अँटिऑक्सिडंट्सचा समावेश

उष्णतेच्या ताणादरम्यान, शरीरातील मुक्त कणाचे प्रमाण वाढल्यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढतो, ज्यामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती आणि पुनरुत्पादक कार्य प्रभावित होते. त्यामुळे कासदाह, प्रजनन दर कमी होतो, गर्भमृत्यूचे प्रमाण वाढणे, अकाली जन्म होणे, जार न पडणे आदी समस्या वाढतात.

कॅरोटीन (अ जीवनसत्त्व), जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व इ यांच्या व्यतिरिक्त सेलेनियम देखील जनावरांच्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. सेलेनियम ग्लुटाथिओन पेरोक्सिडेज एन्झाइमसह अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते.

जंतुसंसर्ग टाळण्याचे उपाय

उन्हाळ्यात जनावरांमध्ये जंतुसंसर्ग झपाट्याने पसरतो, याला प्रतिबंध करण्यासाठी जनावरांची गव्हाण, पाण्याची टाकी नियमितपणे स्वच्छ करावी. टाकीला आतील बाजूस चुन्याचा थर द्यावा.

नेहमी ताजा चारा द्यावा, शिळा चारा खाल्ल्याने जनावरांच्या पोटात अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. जनावर बांधण्याच्या जागेभोवती चुना शिंपडून संसर्गापासून संरक्षण केले जाऊ शकते.

संतुलित आहार

उन्हाळ्यामध्ये दुभत्या जनावरांना योग्य प्रमाणात संतुलित आहार द्यावा. धान्यामध्ये गहू, ओट्स, हरभऱ्याची साल, गव्हाचा कोंडा इत्यादी द्यावे सोबतच मीठ आणि गूळ मिसळून द्यावे. यामुळे जनावरांचे दूध उत्पादन चांगले राहते आणि जनावरे निरोगी राहतात.

गव्हाचे पीठ, मैदा, भाकरी, तांदूळ इत्यादी कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असलेले अन्नपदार्थ जनावरांना देऊ नयेत. उन्हाळ्यामध्ये जनावरांना अधिक हिरवा चारा द्यावा, त्यात ७० ते ९० टक्के पाणी असते.

जनावरांना दिवसातून किमान तीन वेळा स्वच्छ पाणी दिले पाहिजे. उष्णतेच्या ताणामुळे जनावरांच्या पचनसंस्थेवर विपरित परिणाम होतो आणि यासाठी व जनावरांना योग्य खुराक नियमितपणे द्यावा.

जनावरांना खनिज क्षाराचा पुरवठा करण्यासाठी, बांधलेल्या जागी खनिज क्षाराची वीट बांधून ठेवावी.

जनावरांना वेळोवेळी कॅल्शिअम योग्य मात्रेत द्यावे. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये अनेक आजार होतात.

विशेष काळजी

दिवसा थेट सूर्यप्रकाशापासून जनावरांचे रक्षण करावे. त्यांना सकाळी लवकर चरण्यासाठी बाहेर काढावे तसेच त्यांना दुपारपूर्वी गोठ्यामध्ये परत आणावे.

जनावरांना नेहमी सावलीच्या आणि हवेशीर जागीवर बांधावे.

शेडमध्ये थंड हवेची व्यवस्था करावी त्यासाठी पंखे अथवा कुलर वापरता येतील.

वेळोवेळी ताजे, स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी द्यावे.

पौष्टिक आणि संतुलित आहार आणि हिरवा चारा द्यावा.

– डॉ. सचीन राऊत, ७५८८५७१५११

(पशू शल्य चिकित्सा व क्ष किरण शास्त्र विभाग, पशू वैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)