Moringa Health Benefits: आरोग्यदायी शेवगा
सुहासिनी केदारे, डॉ. आर. बी. क्षीरसागर
Moringa Farming: शेवग्याच्या पानांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे (अ, ब, क, इ), लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने कुपोषण, अशक्तपणा, मधुमेह, हृदयरोग आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याचा आहारात समावेश फायदेशीर ठरतो. आहार व विविध उद्योगांमध्ये याचा वापर वाढला आहे.
पानांमध्ये जीवनसत्त्व क आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. सर्दी, खोकल्यावर उपचारासाठी उपयुक्त आहेत.
कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम मुबलक असल्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी शेवग्याची पाने उपयुक्त ठरतात. लहान मुले, गरोदर महिला आणि वृद्धांसाठी हे फायदेशीर आहे.
अशक्तपणा आणि रक्ताल्पता दूर करते. शेवग्याच्या पानांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते, जे हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते, अशक्तपणा दूर करते.
पानांतील अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशिअम रक्तदाब नियंत्रित ठेवतात, कोलेस्टेरॉल कमी करतात, हृदयविकाराचा धोका कमी करतात.
आहारातील तंतू भरपूर प्रमाणात असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते, पचन सुधारते आणि आतड्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
पानांमध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांची दृष्टी सुधारते.
पानांमध्ये नैसर्गिकरीत्या रक्तातील साखर कमी करण्याची क्षमता असते, त्यामुळे मधुमेहींसाठी हे फायदेशीर आहे.
पानांतील जीवनसत्त्व इ आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचा चमकदार ठेवतात, सुरकुत्या कमी करतात. केसांची वाढ सुधारते.
पानांमध्ये फोलेट, लोह आणि कॅल्शिअम असल्यामुळे गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर आहे. स्तन्यपान करणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त ठरते.
आहारात समावेश
भाजी : पानांची भाजी बनवून खाल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात.
चटणी : पाने वाटून चटणी बनवता येते.
पराठे / थालीपीठ : गव्हाच्या कणकेत मिसळून पराठे किंवा थालीपीठ करता येते.
सूप / काढा : हिवाळ्यात किंवा सर्दी-खोकल्याच्या त्रासावर गरम सूप प्रभावी ठरते.
पावडर : वाळलेल्या पानांची पूड भाजी, दूध, ज्यूसमध्ये मिसळतात.
– सुहासिनी केदारे, ९३५९००१९२८
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)