Patanjali Fruit Processing Project : पतंजलीचा प्रकल्प शेती समस्यांचे समाधान ठरेल
Nagpur News : पारंपरिक पीक पद्धती, शेतीमालाला कमी मिळणारा दर, मूल्यवर्धनाचा अभाव हेच विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ आहे. पतंजली समूहाने या भागात फळपिकावरील प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक अशा प्रकल्पाची उभारणी केली. हा प्रकल्प या भागातील शेती समस्यांचे निश्चित समाधान ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
बाबा रामदेव तसेच आचार्य बालकृष्ण यांच्या पतंजली समूहाद्वारे मिहान औद्योगिक क्षेत्रात २३३ एकरावर उभारण्यात आलेल्या पतंजली मेगा फूड पार्कचे उद्घाटन रविवारी (ता. ९) करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार समीर मेघे, आशिष देशमुख यांची उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, ‘‘शेती उत्पादन नाही तर उत्पन्नक्षम करायची असेल तर व्यावसायिक पिकांचा अवलंब करावा लागेल. विदर्भात संत्रा हे मुख्य फळपीक आहे. परंतु या फळांच्या मूल्यवर्धनाचा पर्यायच उपलब्ध नव्हता. त्यातही लहान आकाराच्या संत्रा फळांना बाजारपेठ नसल्याने ती एकतर फेकावी लागत होती किंवा व्यापारी मागतील त्या दरात ही फळे विकण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळेच पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण यांच्याकडे या प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्यात आला.
त्यांनी देखील याला संमती दिली; प्रकल्प उभारणीला ९ वर्षांचा कालावधी लागला असला तरी यापुढे यातून या भागातील संत्रा उत्पादकांचे व्यापक हित जपले जाणार आहे. दर दिवसाला सुमारे ८०० टन संत्र्यावर प्रक्रिया या ठिकाणी होईल. त्यामुळे बागेतील लहान आकाराच्या फळांना बाजारपेठ मिळणार आहे.
नागपुरी संत्र्यांची उत्पाकदता हेक्टरी सात ते आठ टन इतकी अत्यल्प आहे. या तुलनेत स्पेनच्या वॅलेन्सिया भागात टॅंगो जातीच्या संत्रा वाणाची हेक्टरी ७० टन उत्पादकता मिळते. टॅंगो संत्रा वाण विदर्भात उपलब्धतेचा प्रयत्न यापुढे राहणार आहे. बाबा रामदेव यांनी देखील संत्रा उपलब्ध व्हावा याकरिता चांगल्या प्रतीच्या रोप उपलब्धतेसाठी हायटेक नर्सरी उभारावी.’’
विकतच्या जागेवर प्रकल्प
बाबा रामदेव यांनी मेगा फूड पार्कची उभारणी करावी यासाठी विविध राज्यांकडून प्रस्ताव देण्यात आले होते. अशा प्रकल्पांकरिता त्यांना जागा देखील निःशुल्क मिळणार होती. परंतु महाराष्ट्रात पारदर्शी लिलाव प्रक्रियेतून त्यांना जागा विकत घ्यावी लागली. त्यापुढील काळात त्यांनी संत्र्यासह विविध फळांवर प्रक्रिया करणाऱ्या मेगा फूडपार्कची उभारणी केली.
यातून रोजगार निर्मितीचा उद्देश साधला जाणार आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. फूडपार्क महाराष्ट्रात उभारला जावा यासाठी बाबांकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी तो कमी कालावधीत पूर्ण केला, याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. या ठिकाणी हायटेक रोपवाटिका उभारणीसाठी राज्य सरकार पतंजली आयुर्वेद लिमिटेडला मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.