Pomegranate Price: हस्त बहरातील डाळिंब विक्रीला सुरुवात; दर १७५ रुपयांपर्यंत
Sangli News: राज्यातील हस्त बहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे. महिनाभरात डाळिंबाच्या विक्रीला गती येणार असून, हंगामाच्या प्रारंभापासून डाळिंबाला चांगले दर मिळत आहे. सध्या डाळिंबाला प्रति किलोस १०० रुपयांपासून १७५ रुपयांपर्यंत असे दर मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून डाळिंबाचे दर टिकून आहेत. मात्र या बहरातील डाळिंबाला परतीच्या आणि मॉन्सूनोत्तरी पावसाचा फटका बसल्याने उत्पादनात ३० टक्क्यांनी घट होईल, असा प्राथमिक अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे.
राज्यात अंदाजे ३० हजार हेक्टरवर डाळिंबाचा हस्त बहर धरला जातो. गत वर्षी पाणीटंचाईमुळे २० हजार हेक्टरवर बहर धरला होता. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक, अहिल्यानगर या भागांत प्रामुख्याने तसेच ज्या भागात शाश्वत पाण्याची सोय आहे, अशा ठिकाणी हा धरला जातो.यंदा वेळेत पाऊस सुरू झाला. त्यामुळे शाश्वत पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याने यंदा राज्यात ३० हजार हेक्टरवर डाळिंबाचा बहर शेतकऱ्यांनी धरला असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा साधल्या आहेत. सध्या आगाप हस्त बहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे. बाजारात डाळिंबाची मागणी असूनही उठावही चांगला होत आहे. त्यामुळे डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत. दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोस १५० ते १७५ रुपये असा दर आहे. वास्तविक पाहता मृग बहरातील डाळिंबालाही १३० ते १७५ रुपये असा दर होता. अर्थात, गेल्या दोन महिन्यांपासून डाळिंबाचे दर टिकून आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वाढत्या उन्हाचा फटका
दिवसेंदिवस तापमान वाढू लागले आहे. उन्हामुळे डाळिंबाला सनबर्निंगचा प्रादुर्भाव होऊ लागला असल्याने डाळिंबाचे दाणे पांढरे होणे अशी समस्या उद्भविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाचा फटका डाळिंबाला बसू लागला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
प्रतवारीनुसार दर
(प्रति किलो)
प्रत १ १५० ते १७५
प्रत २ १०० ते १२०
प्रत ३ ६० ते ७०
महिन्यानंतर गती येणार
सध्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी, सोलापूर जिल्ह्यांतील सांगोला आणि अहिल्यानगर या भागांतील हस्त बहरातील डाळिंब विक्री सुरू झाली आहे. सध्या काढणीला फारशी गती नाही. नाशिकसह अन्य जिल्ह्यांतील डाळिंब काढणीचे नियोजन शेतकरी करू लागले आहेत. एप्रिलच्या मध्यापासून डाळिंबाच्या काढणीला गती येणार आहे.
मृग बहरात डाळिंबाला चांगले दर मिळाले. आता हस्त बहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली असून या बहरातील डाळिंबालाही चांगले दर मिळत आहेत. डाळिंबाचे दर टिकून राहतील अशी आशा आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ