यशोगाथारेशीम शेती

Farmer success story: Sericulture : रेशीम शेतीतून आर्थिक समृद्धीचा मार्ग

Agriculture Success Story : सांगली शहरापासून शंभर किलोमीटरवर जत तालुका आहे. गेल्या आठ वर्षापूर्वी या तालुक्यात टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आले. शेतकऱ्यांची इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर माळरानावर डाळिंब, द्राक्ष बागांचा विस्तार झाला आहे. जत शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर वसलेल्या शेगाव शिवारानेही दुष्काळाचे चटके सोसले आहेत. या गावशिवारातील नवनाथ पांडुरंग मोहिते हे प्रयोगशील शेतकरी.

मोहिते यांचे मूळ गाव शेगावपासून पाच किलोमीटरवर असलेले कोसारी. घरची पाच एकर कोरडवाहू शेती. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच. पाणी टंचाईमुळे शेती असूनही पुरेसे उत्पन्न हाती येत नव्हते. पूर्ण शेती पावसाच्या भरवशावर होती. शेतात पिकलं तरच घरात धान्य यायचं, अशी परिस्थिती होती.

पांडुरंग मोहिते यांना नवनाथ, सुरेश आणि दिगंबर ही तीन मुले. शिक्षणाची आवड असूनही पैशांची कमतरता असल्याने नवनाथ आणि दिगंबर यांनी शिक्षण अर्ध्यातून सोडले. मात्र त्यांनी सुरेश यांच्या शिक्षणासाठी आग्रह धरला. सुरेश यांनी एम.एस्सी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. ते सध्या मुंबईमध्ये एका कंपनीत नोकरी करतात.

कोरडवाहू शेती परिस्थितीबाबत पांडुरंग मोहिते म्हणाले की, माझ्या दावणीला दोन बैल. नांगर, फळ, कुळव असं सारं होतं. गावोगावी जाऊन मी शेती मशागत करायचो. त्यातून मिळणारा पैसा साठवला. मशागतीची कामे नसतील तेव्हा दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जायचो. शेतीत कष्ट करण्यास कसला कमीपणा वाटून दिला नाही. कष्टानं लढायला शिकवलं. मुलगा नवनाथ याचे बालपण शेगावमध्ये गेले. त्याने दहावी झाल्यानंतर गावात चहाचा गाडा सुरु केला.

यातून काही प्रमाणात कुटुंबाला आर्थिक हातभार लागला. दिगंबर हा कलकत्ता येथे गलाईचे काम करु लागला. दोन पैसे हाती आल्याने सुरेश यांचे शिक्षण पूर्ण झाले. या काळात नवनाथ याने शेती मशागत, जमीन सपाटीकरणाच्या कामासाठी डोझर घेतला.

त्याला चांगल्या प्रकारे कामे मिळू लागली. शेती करण्याची आवड होती, पण पाणी नसल्याने काय करायचे हा प्रश्न होताच. दरम्यान दिगंबर हा गलाईचे काम सोडून गावी आला,त्याने शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. तसेच नवनाथ याला साथीला घेऊन शेतीकामासह चहाचा व्यवसाय वाढविला.

आठ वर्षापूर्वी टेंभूचे पाणी जत तालुक्यातील कुंभारीपर्यंत आले होते. भविष्यात शेगाव शिवारात पाणी येण्याची आशा तयार झाली. त्यामुळे २०१५ मध्ये कोसारी गावातील शेती विकून शेगावमध्ये साडे चार एकर माळरान जमीन विकत घेतली. शाश्वत पाण्याची सोय होणार असल्यामुळे अडचण नव्हती. शेती घेतली तरी नवनाथ हे ट्रॅक्टरने मशागत आणि जमीन सपाटीकरणाची कामे करत होते. या उलाढालीतून आमच्या कुटुंबाने शेतामध्ये घर बांधले.

रेशीम शेतीच्या दिशेने…

नवनाथ मोहिते यांचे शिवाजी गायकवाड यांच्या शेतात मशागतीचे काम सुरु होते. त्यावेळी गायकवाड यांनी कमी खर्चात महिन्याला अपेक्षित उत्पन्न मिळवून देणारी रेशीम शेती हा चांगला व्यवसाय आहे, अशी माहिती नवनाथ यांना दिली.

रेशीम शेतीची माहिती घेण्यासाठी नवनाथ यांनी चंद्रकांत निकम यांना सोबत घेतले. रेशीम शेतीची माहिती मिळवण्यासाठी हुपरी (कोल्हापूर), तांदुळवाडी (ता.पंढरपूर), दऱ्याप्पा बिराजदार (शेगाव) यासह कर्नाटकातील गद्याळ, गोटे परिसरातील प्रयोगशील रेशीम उत्पादकांच्या भेटीगाठी घेतल्या. तांत्रिक माहिती जमवली.

या वाटचालीबाबत नवनाथ मोहिते म्हणाले की, खरा कस होता तो शेतकऱ्यांच्या प्रकल्पातील विविध बाबींचा अभ्यास करण्याचा. संगोपन शेड, अंडीपुंजाची संख्या, लाकडी रॅक, लोखंडाची रॅक उभारणी, दर्जेदार कोष निर्मितीसाठी व्यवस्थापन या सर्व बाबी समजाऊन घेतल्या.

प्रामुख्याने अंडीपुंजाची संख्या, दर्जेदार तुतीचा पाला या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. संगोपनाच्या बाबी समजून घेताना बाजारपेठेचाही अभ्यास केला. रेशीम शेतीचा प्रकल्प उभारणीसाठी जिल्हा रेशीम विभागातील तज्ज्ञांशी संपर्क साधला. या विभागामध्ये विविध योजनांची माहिती मिळाली. २०१७ मध्ये रेशीम उद्योग उभारणीसाठी मनरेगातून दोन लाखांपर्यंत अनुदान मिळाले आणि रेशीम शेतीला सुरूवात झाली.

रेशीम शेतीचे व्यवस्थापन

  • तीन एकरावर व्ही वन तुती वाणाची लागवड. तुती पाला दर्जेदार मिळण्यासाठी काटेकोर व्यवस्थापन. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढीसाठी शेणखत, कोंबडी खताचा वापर. यामुळे उच्च प्रतीचा पाला तयार होण्यास मदत.
  • ८० फूट बाय २४ फूट आकारमानाचे रेशीम अळी संगोपन शेड. यामध्ये दहा रॅक. प्रत्येक रॅकचे आकारमान पाच फूट रूंद आणि ७० फूट लांब.
  • वर्षाला सहा बॅच. प्रति बॅच १३० ते १५० अंडीपुंजांचा वापर. हेब्बाळ (कर्नाटक), धाराशिव येथून अंडीपुंजांची खरेदी. प्रति शंभर अंडीपुंजाचा दर ४,२०० रुपये.
  • कोष तयार होण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी. बॅच संपण्यापूर्वी अंडीपुंजाची मागणी नोंदविली जाते. बॅच संपल्यानंतर शेडचे दोन वेळा निर्जंतुकीकरण.
  • रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चुना आणि विजेता पावडरची धुरळणी. तसेच रॅक स्वच्छ धुतले जातात.

घरच्यांची मिळाली साथ

शेतीला शाश्वत पाणी झाले, त्यामुळे गावशिवारात मजुरांची उपलब्धता कमी आहे. नवनाथ यांना वडील पांडुरंग, आई लक्ष्मी, पत्नी मनीषा, भाऊ दिगंबर, वहिनी मोनिका यांची रेशीम शेतीमध्ये चांगली साथ मिळाली आहे. मोहिते कुटुंबातील सदस्य तुती पाला कापणीपासून ते कोष गोळा करण्यापर्यंतची सर्व कामे करतात. नवनाथ यांची पत्नी मनीषा या गरजेनुसार शेती कामासाठी ट्रॅकरदेखील चालवतात.

कोरोनो काळात कोष विक्रीचे संकट होते. पण त्यावर मार्ग काढत मोहिते कुटुंबाने कोष विक्री सुरु ठेवली. बाजारापेठेत कोषाचे दर कमी अधिक होत असतात. अशा स्थितीतही मोहिते कुटुंबाने रेशीम बॅच घेण्याचे नियोजन कधीच लांबणीवर टाकले नाही. रेशीम कोष उत्पादनात सातत्य असल्याने विक्री करणे सोपे झाले आहे. दर महिन्याला चाळीस हजारांचे उत्पन्न रेशीम शेतीतून मिळू लागल्याने अर्थकारण मजबूत झाले आहे.

उत्पादन आणि बाजारपेठ

अंडीपुंजांची संख्या मर्यादित ठेवल्यामुळे दर्जेदार कोष तयार होण्यास मदत होते. अंडीपुंजांच्या एका बॅचमधून १३० ते १४० किलो कोष उत्पादन मिळते. त्यापैकी ८० ते ९० टक्के उत्पादन हे ए ग्रेडचे असते. – रेषीम कोषांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ कर्नाटकात रामनगर येथे आहे. सुरुवातीला या बाजारपेठेत विक्री केली जात होती. त्यानंतर आता हेब्बाळ, अथणी, गोकाक या ठिकाणीही कोष विक्रीसाठी पाठविले जातात.

प्रति किलो कोषाला सरासरी ४५० ते ५०० रुपये दर. बाजारपेठेत मागणी आणि पुरवठा यावर दर ठरला जातो. काही वेळेस प्रति किलो २०० ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. सातत्य ठेवल्याने फारसे आर्थिक नुकसान झाले नाही.

गाव परिसरातील रेशीम कोष उत्पादकांशी सातत्याने संपर्क. कोष विक्री करतेवेळी एकाच गाडीतून सर्व शेतकरी कोष बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवितात. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचतो.

नवनाथ मोहिते, ९०४९५१३९३९