Wildlife Species: पुणे जिल्ह्यात सातशेहून अधिक वन्यजीव प्रजातींचा अधिवास
Pune News: पुणे जिल्ह्यात सातशेहून अधिक वन्यजीव प्रजाती असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे. पुणे वन विभागाच्या नेतृत्वाखाली विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या जैवविविधता मॅपिंग उपक्रम राबविण्यात आला होता.
त्यापैकी सर्वाधिक ३३२ प्रजाती पक्ष्यांच्या श्रेणीतील आहेत आणि त्यानंतर ११० माशांच्या प्रजाती जिल्ह्यातील विविध भागांत नोंदवल्या गेल्या आहेत. विभाग लवकरच पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेवर एक लघु वन्यजीव चित्रपट प्रदर्शित करणार आहे, अशी माहिती पुणे वन मंडळाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिली.
वन विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात आयोजित विविध जैवविविधता मॅपिंग अभ्यासादरम्यान विविध स्वयंसेवी संस्थांनी ही माहिती गोळा केली आहे. आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात किमान १२ वन्यजीव हॉटस्पॉट आहेत.
जिथे मोठ्या प्रमाणात वन्यजिवांची उपस्थिती दिसून येते. यामध्ये सिंहगड किल्ला आणि दरी क्षेत्र, पाबे घाट, राजमाची, मुळशी, ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य, मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य, पर्वती-वेताळ टेकडी, पाषाण तलाव, लोणावळा धरण, वीर धरण, दिवे घाट, बोपदेव घाट आणि सासवड, आळंदी आणि काही इतर ठिकाणांचा समावेश आहे.
तथापि, जैवविविधतेला आता अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ज्यामध्ये अधिवास अतिक्रमण आणि भू-वापरातील बदल, अनिर्बंध छायाचित्रण, विदेशी प्रजातींचे आक्रमण आणि इतर अनेक आव्हाने समाविष्ट आहेत. हे टाळण्यासाठी, विविध प्रजातींच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी धोरण तयार करणे आणि अंमलात आणणे आवश्यक आहे.
या अभ्यासातून पुण्याच्या जैवविविधतेची अद्भुत माहिती मिळाली आहे. पुण्यातील जैवविविधतेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, असेही प्रवीण यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्याचे भूप्रदेश वेगवेगळे आहे. तो विविध पक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींसाठी एक आदर्श अधिवास आहे. आपल्याकडे पक्ष्यांची इतकी प्रचंड विविधता आहे की पुणे हे केवळ स्थानिक पक्ष्यांसाठीच नव्हे तर स्थलांतरित पक्ष्यांसाठीदेखील एक आदर्श अधिवास म्हणून घोषित केले जाऊ शकते.
अनुज खरे, वन्यजीव अभ्यासक, पुणे